नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. मृतांची आकडेवारीही झपाट्याने वाढत गेली. दरम्यान, या सर्वात भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे चीन असल्याचा दावा केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने चीनला आव्हान देत आहेत, आणि याचे प्रत्युत्तर म्हणून चीनने व्हायरल वॉर सुरू केले आहे,’ असे विधान भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांनी केले आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदोर येथे बोलताना हे विधान केले. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजयवर्गीय म्हणाले, ‘करोनाची दुसरी लाट पसरली की, पसरवली गेली. हा चौकशीचा विषय आहे. जगामध्ये कुणी चीनला आव्हान दिलं असेल, तर ते भारताने आणि मोदींनी दिलं आहे. हा चीनने केलेला व्हायरल हल्ला आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे,’ असे विजयवर्गीय म्हणाले.

‘भारताला संकटात टाकण्यासाठी चीनने हा व्हायरल हल्ला केला आहे, असं आम्हाला वाटतं. कारण भारतातच करोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान वा अफगाणिस्तानात पसरलेली नाही. चीनचा हा व्हायरल हल्ला भारताच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी केलेला कटाचा भाग आहे. अशावेळी आपण देशासोबत एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. आम्ही पक्षासाठी नाही, तर देशासाठी काम करत आहोत,’ असे विजयवर्गीय म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. ऑक्सिजन संकट उद्भवलेले असताना पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. नौदल, लष्कर आणि वायूदलाची मदत घेतली गेली.

नौका, विमान आणि ट्रेनच्या मदतीने ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. सुरूवातीचे चार-पाच दिवस आपल्याला त्रास झाला. आम्हाला दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि तिच्या परिणामांविषयी माहिती नव्हती,’ असेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!