डिसेंबर आधी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होणार – संजय राऊत

नवी दिल्ली : ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरआधी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन होईल,’असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं राऊत म्हणाले. शिवसेनेची प्रक्रिया ही गतीमान आहे.  तसेच शिवसेनेमध्ये सगळं आदेशावर चालतं. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आदेश द्यायचे. आता उद्धवजी देतात. त्यामुळं आमच्याकडं ही प्रक्रिया वेगवान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सल्ल्यानुसार निर्णय होतो. काँग्रेसमध्ये थोडी वेगळी पद्धत आहे. हा शंभर वर्षे जुना पक्ष आहे. त्यांच्याकडं अनेक स्तरांवर चर्चा होऊन मग अंतिम निर्णय होतो. त्यामुळं थोडा वेळ लागतो. मात्र, त्यांचीही चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे,’ असं राऊत म्हणाले.

ज्या लोकांना वाटतं राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असंही त्यांनी नमूद केलं. आमच्यामध्ये कोणतेही दोन गट नाहीत. तसंच शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.