क्वारंटाईनसाठी जागा नाही, तरूणाने ठोकला 11 दिवस झाडावर मुक्काम

हैदराबाद : करोनाच्या दुसर्‍या लाटेचा तडाखा सर्वसामान्यांसह श्रीमंतानाही बसला आहे. बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने अनेक करोना रुग्णांचे हाल पाहावेनासे झाले आहेत. या सगळ्यामध्ये आता आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे.

करोना झाल्यानंतर रुग्णाला घरातील इतर व्यक्तींपासून वेगळे राहण्याची गरज आहे. अन्यथा इतर व्यक्तींही बाधित होण्याची शक्यता असते. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून ११ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची घटना घडली.

या तरुणाचे नाव शिवा असून तो अवघ्या १८ वर्षांचा आहे. कोठानंदीकोटा गावात राहणार्‍या शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरातच क्वारंटाईन व्हायला सांगितले होते. मात्र, घर लहान असल्याने शिवाला तिथे राहणे शक्य नव्हते. अशावेळी गावकर्‍यांनी शिवाला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, कोणीही शिवाच्या मदतीसाठी पुढे आले नाही. तेव्हा शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून ११ दिवस काढले.

 

You May Also Like