बापरे…भटक्या कुत्र्यांनी स्वच्छता निरीक्षकाचेच तोडले लचके, कर्मचारी रक्तबंबाळ

सांगली : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून लहान मुले तसेच नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाहीये. तशी तक्रार नागरिक करत आहेत. दरम्यान भटक्या कुत्र्याने  थेट एका महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकावरच हल्ला केला आहे. हा हल्ला एवढा गंभीर आहे की, यामध्ये कुत्र्यांनी स्वच्छता निरीक्षकाचे चक्क लचके तोडले. श्रीकांत मद्रासी असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात मद्रासी हे रक्तबंबाळ झाले आहेत.

कुत्र्याचा अचानकपणे हल्ला, चेहरा रक्तबंबाळ
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये ही घटना घडली. यावेळी स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर भटक्या कुत्र्याने अचानकपणे हल्ला केला. काही करण्याच्या आत मद्रासी यांना कुत्र्याने घेरले. यामध्ये कुत्र्याने हल्ला केल्यामुळे मद्रासी यांना काहीही सुचले नाही. भटक्या कुत्र्याने मद्रासी यांच्या संपूर्ण अंगाचे लचके तोडणे सुरु केले. यावेळी मद्रासी यांच्या चेहर्‍यालासुद्धा भटक्या कुत्र्याने सोडले नाही. कुत्र्याने त्यांच्या चेहर्‍याचासुद्धा चावा घेतला. या हल्ल्यामध्ये मद्रासी हे जखमी झाले आहेत.

लहान मुलांवरही हल्ला
मागील काही दिवसांपासून सांगली मनपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मद्रासी यांच्यावर हल्ला करण्याआधीसुद्धा भटक्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांवर हल्ला केला आहे. यापूर्वी अनेकवेळा कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सारे प्रकार घडूनसुद्धा भटक्या कुत्र्यांकडे कायम दुर्लक्ष केले गेले.

महापालिकेला आतातरी जाग येणार का ?
दरम्यान, स्वच्छता निरीक्षक मद्रासी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सांगली मनपा भागात खळबळ उडाली आहे. अनेकांनी भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. हा हल्ला झाल्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल स्थानिक नगरसेविका सविता मदने यांनी उपस्थित केलाय. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या बाबत आरोग्य विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र दखल घेतली जात नाही. लहान मुले, नागरिकच काय जनावरांवरुसुद्धा कुत्री हल्ला करतात. आता तर स्वच्छता निरीक्षकच कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले, अशी थेट प्रतिक्रिया मदने यांनी दिली आहे.

You May Also Like