‘ठाकरी तोफ’ कोणावर धडाडणार? शिवसेनेचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

मुंबई । मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शनिवारी बीकेसी ग्राऊंडवर होतेय. या सभेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केलीय. सुमारे दोन लाख शिवसैनिक या सभेला जमतील असा अंदाज वर्तवला जातोय. हिंदुत्वासह इतर अनेक मुद्यांवरून मुख्यमंत्री विरोधकांचा खरपूर समाचार घेण्याची शक्यता आहे.
सोशल मिडियातील टिझरपासून ते मुंबईतल्या रस्त्यांवरील होर्डिंग्जपर्यंत सध्या हवा आहे ती शिवसेनेच्या 14 मेच्या शिवसेनेच्या सभेची. ‘हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायला पाहिजे’ या टॅगलाईनवरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अजेंड्यावर हिंदुत्व हा मुद्दा असेल हे स्पष्ट आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेवून शिवसेनेला लक्ष्य करणं सुरु केलं आहे. तसंच भाजपकडूनही शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची वारंवार टिका होतेय. त्यामुळंच उद्वव ठाकरे यांच्या सभेत हिंदुत्व हा मुद्दा महत्त्वाचा असेल.
हिंदुत्वाबरोबरच भोंगा, हनुमान चालिसा, महागाई, भाजपच्या पोलखोल सभा, केंद्र सरकारकडून होणारी अडवणूक या प्रमुख मुद्यांवरही उद्वव ठाकरे प्रहार करतील. टीकेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या निशाण्यावर असतील ते राज ठाकरे. दुसरा क्रमांक लागेल तो देवेंद्र फडणवीस यांचा. त्यानंतर नंबर लागणार तो नवनीत राणा आणि रवी राणा यांचा.
केंद्रिय यंत्रणांकडून होत असलेल्या गैरवापरचा मुद्दाही या सभेत महत्त्वाचा असेल. तसंच ओबीसी आरक्षणामुळे झालेली कोंडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही विषय त्यांच्या भाषणात असेल. मुंबई महापालिका ही शिवसेनेचा जीव आहे आणि ही निवडणूकही येवू घातलीय. सभाही मुंबईतच होत असल्यानं साहजिकच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही याच सभेतून शिवसेना रणशिंग फुंकणाराय आणि याची पूर्ण तयारी बीकेसी ग्राऊंडवर करण्यात आलीय.
राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा घेवून शिवसेनेला केलेले लक्ष्य, राणा दांम्पत्यांचा हनुमान चालिसा आणि भाजपकडून वारंवार उपस्थित होत असलेला हिंदुत्वाचा मुद्दा अशा चहुबाजूंनी शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केलं जात होते. राज ठाकरे यांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद आणि भाजप पोलखोल सभांच्या माध्यमातून पालिकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा वारंवार उपस्थित करत होते. या सर्व प्रश्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्यासाठी शिवसेनेने या शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केलीय.

 

You May Also Like