12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक, उद्या कामकाजावर बहिष्कार, राऊतांची माहिती

नवी दिल्ली । पावसाळी अधिवेशनात संसदेत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर या अधिवेशनाच्या सुरूवातीलच गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यात शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश होता. काँग्रेसच्या 6 खासदारांचा समावेश होता. तर 2 खासदार तृणमूल काँग्रेसचे होते. शिवसनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे.
—–उद्या राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार
12 खासदाराच्या निलंबनावरून आक्रमक होत उद्या विरोधक राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस होता. अधिवेशनाचे कामकााज सुरू होण्याआधी भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. तर दुसरीकडे सदनातला गदारोळ सुरूच आहे. 12 सदस्यांचे निलंबन झाल्याने समान विचारधारेचे विरोधी पक्ष एकत्र येत राज्यसभेच्या उद्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.
—–राहुल गांधींचा अधिवेशनात आक्रमक पवित्रा
तर दुसरीकडे अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारांना मदत देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी केली. तर दुसरीकडे भाजपच्या सर्व खासदारांनी अधिवेशनात उपस्थिती लावावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.
—–उद्याही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता
उद्याही संसदेत विविध मुद्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण 12 सदस्यांच्या निलंबनावरून शिवसेनेसह इतरही विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज 12 सदस्यांच्या निलंबनावरून काही काळ राज्यसभेचे कामकाजही स्थगित झाल्याचे पहायला मिळाले.

You May Also Like