..अन्यथा जिल्हाधिकार्‍यांवरच करणार कारवाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ब्रेक द चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच लेव्हल्स ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत. कोणत्याही पातळीवर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नाहीतर थेट जिल्हाधिकार्‍यांवरच कारवाई केली जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकार्‍यांची हजेरी घेतली.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग हा विविध सण-उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढला होता, या वेळेस दुसरी लाट सणावारांच्या अगोदर आली आहे. म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर राज्यात तिसर्‍या लाटेत मोठे आव्हान उभे राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, दुसर्‍या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे.

ब्रेक द चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष व पातळ्या निश्चित करणार्‍या 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

ज्यापद्धतीने आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेवर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पावले उचलतो अगदी त्याचप्रमाणे करोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

You May Also Like