परमबीर सिंग यांना दिलासा, जूनपर्यंत अटक नाही

मुंबई : माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक होणार नाही असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तसेच परमबीर सिंग यांच्यावर 24 मेपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला होता.

मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली. परमबीर सिंग यांचे प्रकरण रेग्युलर कोर्टात चालवले जाणार आहे. परमबीर सिंग यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली. तसंच 9 जूनपर्यंत अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयाला दिली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे आज यावर ऑनलाईन सुनावणी झाली.

उन्हाळी सुट्टी सुरु असल्यामुळे उच्च न्यायालयाकडून महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु आहे. न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं शुक्रवारीही तब्बल 13 तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. मात्र रात्री 12 पर्यंतही सुनावणी पूर्ण झाली नाही म्हणून खंडपीठाने अखेरीस पुढील सुनावणी सोमवारी (24 मे रोजी) ठेवली आणि तोपर्यंत परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश देण्यात आले होते.

You May Also Like