व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांचे झाले हाल; सुदैवाने जीवितहानी नाही

नाशिक रोड : एका व्हेन्टिलेटर्स मशीनमध्ये शॉर्टसर्किटने धुर व जाळ होऊन ते बंद पडल्याची घटना येथील महापालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयात घडली. तिस-या मजल्यावरील व्हेंटिलेटर कक्षात आज रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खळबळ उडाली. या व्हेंटीबरोबर अन्य चार व्हेन्टिलेटर्सही बंद पडली. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराहट पसरली. डॉ. जितेंद्र धनेश्वर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी तातडीने उपाययोजना केली. त्यांनी रुग्णांवर त्वरित उपचार केल्याने दुर्घटना टळली. घटनेची माहिती कळताच महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड तातडीने आले. नगरसेवक जगदीश पवार, बाजीराव भागवत हे देखील आले. त्यांनी संबंधित कक्षामध्ये जाऊन माहिती घेतली. महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारीही दाखल झाले. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आली आहे.

या घटनेत चार रुग्ण दगावल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. मात्र ते चुकीचे असून कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी पत्रकारांना माहिती दिली.

आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अकरा नंबरच्या बेडचा व्हेन्टिलेटर शॉर्टसर्किट होऊन जळाला. त्यामुळे तो बंद पडला. त्यातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली. त्याचबरोबर 8,9,10 या बेडचे व्हेन्टिलेटर्सही बंद पडले. तथापी, थोड्याच वेळात ते चालू करण्यात यश आले. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन येथील रुग्णांना इतरत्र हलवले. अन्य रुग्णांमध्ये घबराहट पसरली. यावेळी कक्षात गर्दी झाली होती. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही असे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले. दरम्यान, व्हेंटिलेटर मध्ये अचानक जाळ व धुर कसा झाला? याबाबत प्रशासन चौकशी करीत आहे.

बिटको रुग्णालयातील रुग्णसंख्या सातशेच्यावर होती. ती आता साडेचारशेवर आली आहे. या घटनेमुळे जाकीर हुसेन रुग्णालयाच्या दुर्घटनेची आठवण नागरिकांना झाली. त्या घटनेत ऑक्सिजन प्रकल्पात गळती होऊन 24 जण महिनाभरापूर्वी दगावले होते. तीन दिवसांपूर्वी नगरसेविकेच्या पतीने इनोव्हा कार थेट रुग्णालयाचा काचेचा मोठा दरवाजा तोडून आत घातल्याने खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आजची घटना घडली. त्यामुळे बिटको रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे…

You May Also Like