हत्तीवर खुनाचा गुन्हा, पोलिसांनी केली अटक

दिसपूर ।  राजकीय नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल होताना आपण अनेकदा पाहतो. पण राजकीय नेत्यांनी पाळलेल्या प्राण्यांवर गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे. खून केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एक हत्तीण  आणि तिच्या पिल्लाला अटक केली आहे. आसाममधील बोकाखाट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

आसाममधील बोकाखाटचे माजी आमदार जितेन गोगोई यांनी एक हत्तीण पाळली आहे. त्या हत्तीणीला एक पिल्लू आहे. या दोघांनी एका लहान मुलाचा खून केल्याची तक्रार त्यांच्याविरुद्ध करण्यात आली आहे. 8 जुलै रोजी दुलुमणी नावाच्या या हत्तीणीनं आणि तिच्या पिल्लानं एका 14 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याची ही तक्रार आहे. या तक्रारीचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत हत्तीण आणि तिचं पिल्लू पोलिसांच्या ताब्यात राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमांता शर्मा यांनी गुन्हेगारीविरोधात कडक पावलं उचलली आहेत. अनेक गुंडांचा साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून निःपात करण्याची मोहिम सरकारनं आखली आहे. या मोहिमेत पोलिसांवर उलट हल्ला चढवणाऱ्या गुंडांचा एन्काऊंटर होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर एका हत्तीणीला झालेली अटक हा राज्यात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. एका प्राण्याकडून अभावितपणे घडलेली ही कृती आहे की हत्तीणीच्या नावाखाली कुणी जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणला असावा, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. लवकरच या प्रकरणाचे धागेदोरे समोर येतील आणि सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत. तोपर्यंत मात्र हत्तीणीला आणि तिच्या पिल्लाला पोलिसांच्या ताब्यात राहावं लागणार आहे.

You May Also Like