प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय, वंचितला युती किंवा आघाडीचे पर्याय खुले

औरंगाबाद । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती वा आघाडी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक चर्चा करून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य कार्यकारणीसमोर ठेवावा. मग त्यावर निर्णय घेता येईल, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडली. या भूमिकेमुळे ‘वंचित’ने युती व आघाडीचे पर्याय खुले केले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून पक्ष महाराष्ट्रात नव्या जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.
संघटनात्मक ऊर्जा व नियोजन यांची सांगड घालून पक्ष रचनात्मक काम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भानगडीत महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित आहेत. याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष द्यायला तयार नाही. महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे हाल झाले असून तरुणांना दिशाहीन केले जात आहे. तरुणांची माथी भडकवली जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मजबुतीने लढण्याचा निर्धार बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. प्रस्थापित धर्मवादी आणि जातीवादी पक्षांनी वंचितांची राजकीय लढाई संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पक्षाच्या सभासद नोंदणीवर, ‘प्रबुद्ध भारत’च्या नोंदणीवर भर देण्यावर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणा पक्षासोबत युती वा आघाडी करायची आहे, त्याबाबत जिल्हाध्यक्ष व त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी प्राथमिक चर्चा करून युती व आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारणीसमोर ठेवावा. तेव्हा त्यावर निर्णय घेता येईल, अशी भूमिका ॲड. आंबेडकर यांनी मांडली. यावेळी अशोक सोनोने, किसन चव्हाण, धैर्यवर्धन पुंडकर, फारूक अहमद, अरुंधती शिरसाट, अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, प्रियदर्शी तेलंग, सिध्दार्थ मोकळे, नागोराव पांचाळ, गोविंद दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You May Also Like