डॉक्टरर्स डेनिमित्त पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : करोना काळात डॉक्टरांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे सर्व 130 कोटी देशवासियांच्या वतीने मी सर्व डॉक्टरांचे आभार मानतो. डॉक्टर हे ईश्वराचं दुसरं रुप आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जेव्हा देश कोविडविरोधात सर्वात मोठी लढाई लढत होता. तेव्हा डॉक्टरांनी लाखो रुग्णांचा जीव वाचवला. अनेक डॉक्टरांनी करोना काळात स्वत:चं बलिदान दिलं. मी सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आमच्या सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आमच्या सरकारनं आरोग्य सुविधांसाठी 15 हजार कोटी वितरीत केले होते. यावर्षी आरोग्य सुविधांसाठी 2 लाख कोटींहून अधिक बजेटचं वाटप करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले.

आज देशात सगळीकडे वेगाने एम्स आणि मेडिकल कॉलेज उघडले जात आहेत. आधुनिक आरोग्य विकासावर भर दिला जात आहे. 2014 मध्ये देशात केवळ 6 एम्स होते, पण या 7 वर्षाच्या काळात 15 नवीन एम्सचं काम सुरू झालं आहे. मेडिकल कॉलेजची संख्या जवळपास दीडपटीने वाढली आहे. डॉक्टरांनी योगालाही चालना दिली पाहिजे. जेव्हा डॉक्टर योगाचा अभ्यास करतात तेव्हा संपूर्ण जग त्याला अधिक गंभीरतेने घेईल. ज्या संख्येने तुम्ही रुग्णांची सेवा आणि देखभाल करत आहात. त्या तुलनेत तुम्ही जगाच्या खूप पुढे गेला आहात. तुमच्या कार्याची, तुमच्या वैज्ञानिक संशोधनापासून जगाला धडा घेऊन पुढील पिढीला त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आतापर्यंत देशात ज्यापद्धतीने आरोग्य विकास झाला त्याला काही मर्यादा होत्या हे तुम्हाला माहिती आहे. पूर्वीच्या काळात आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आमच्या सरकारचा फोकस आरोग्य सुविधांवर आहे. आरोग्य विकास मजबूत करण्यासाठी 50 हजार कोटींची क्रेडिट गॅरंटी स्कीमची घोषणा करण्यात आली आहे. आमचं सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. मागील वर्षी आम्ही डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यांविरोधात कठोर कायद्याची तरतूद केली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

You May Also Like