विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

नवी दिल्ली।  पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकास्त्र सोडले आहे.  नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी विरोधक गोंधळ घालत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिला मंत्री झाल्याचं काहींना पटलेलं दिसत नाही. त्यांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला.

 

या दरम्यान, लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आणि मंत्र्यांचा परिचय करू देण्याची विनंती केली. परंपरेला छेद देऊ नका. तुम्ही दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तुम्ही परंपरेला तोडून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका. सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा. पंतप्रधान हे सभागृहाचे नेते आहेत. ते नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं, असं आवाहन बिरला यांनी केलं.लोकसभा आणि राज्यसभेत नव्या मंत्र्यांचा पंतप्रधानांनी परिचय करून देण्यास सुरुवात केली. मोदी मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे राहताच दोन्ही सभागृहात गोंधळ झाला होता. त्यावरून मोदींनी विरोधकांना सुनावले.

 

आज दलित समाजातील काही नेते मंत्री झाले आहेत. अनेक मंत्री ग्रामीण भागातील आहेत. पण काही लोकांना हे पटलेलं नाही. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला आणि ओबीसी आदी घटकातील लोक मोठ्या संख्येने मंत्री झाले आहेत. त्यामुळे सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, असंही ते म्हणाले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील लोकांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांची ओळख करून देत असताना विरोधकांना आनंद व्हायला हवा होता. पण दलित मंत्री बनावा, महिला मंत्री व्हाव्यात, ओबीसी मंत्री व्हावेत, शेतकऱ्यांची मुलं मंत्री व्हावेत हे काही काही लोकांना पटलेलं दिसत नाही असे त्यांनी सांगितलं.

You May Also Like