‘त्या’ मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा; मित्रपक्षाची मागणी

पाटणा : लस घेतल्यानंतर देणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भाजपच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली. झारखंड आणि छत्तीसगडनं तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी करोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी मांझी यांनी केली आहे.

बिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा या आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळेच मांझी यांनी केलेल्या मागणीनं सगळ्यांनाच धक्का बसला. ’करोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणार्‍या प्रमाणपत्रावर मोदींचं छायाचित्र छापण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जीव गमावणार्‍या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा,’ असं ट्विट मांझी यांनी केलं आहे.’लसीच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापण्याचा इतकी हौस असेल तर कोरोनामुळे दगावणार्‍या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील फोटो छापला जावा. तेच न्यायाला धरून असेल,’ असं मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केलं.

You May Also Like