अभिमानास्पद! विद्यार्थ्यांच्या फी साठी मुख्याध्यापिकेने जमवले 40 लाख

मुंबई : करोनाच्या संकटात रोजगार नसल्यानं फी भरणं ज्या विद्यार्थ्यांना शक्य झालं नाही अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं स्वत: मेहनत घेऊन लोकांकडे मदतीचं आवाहन करुन तब्बल 40 लाख रुपये जमा केले आहेत.

या 40 लाख रुपयांतून या मुख्याध्यापिकेनं तब्बल 200 विद्यार्थ्यांची शाळेची फी तर भरली आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच शिक्षकांचे पगार देखील दिले आहेत.

मुंबईतील पवई येथील पवई इंग्लंड शाळेच्या मुख्याध्यापिका शर्लिन उदयकुमार यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शर्लिन यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. लॉकडाऊनमुळे शाळेत शिक्षण घेणार्‍या अनेक पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि आर्थिच चणचण निर्माण झाली. त्यात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांची नोकरी गेल्यामुळे फी भरू शकत नाहीत, हे शर्लिन यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांनाही त्यांचा मोबदला मिळावा यासाठी धडपड सुरू केली. सोशल मीडियाचा वापर करुन मदतीचं आवाहन केलं. याशिवाय अनेक कंपन्यांशीही संपर्क साधला. सुरुवातीला त्यांना कुणाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश आलं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!