पुणे : इंदापूर तालुक्‍याने करोनाची पहिली व दुसरी लाट जनतेने अनुभवलेली आहे

रेडा -इंदापूर तालुक्‍याने करोनाची पहिली व दुसरी लाट जनतेने अनुभवलेली आहे. परंतु जी तिसरी लाट येणार आहे. या संदर्भात वय अठरा वर्षांच्या खालील मुलांना, तसेच लहान मुलांना फटका बसण्याची शक्‍यता आहे.

यानुसार इंदापूर तालुक्‍यामध्ये तिसऱ्या लाटेच्या संदर्भात योग्य उपचार बालकांना मिळतील. शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करीत आहोत, अशी माहिती बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

कांबळे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यामध्ये बाल रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुविधांची प्राथमिक स्तरावर माहिती संकलित करीत आहोत. यामध्ये ऑक्‍सिजन बेड, साधे बेडची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेत आहोत.

यानुसार आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपलब्ध असणाऱ्या सेवा, सुविधा व आणखी अधिक प्रमाणात काय सुविधा देता येतील, याचा परिपूर्ण अभ्यास करून तयारी सुरू आहे. उपविभागीय अधिकारी कांबळे म्हणाले की, लहान मुलांसाठी जी औषधे उपलब्ध नसतील, त्यांची मागणी करीत आहोत.

सर्व उपचार तालुक्‍यामध्ये उपलब्ध व्हावेत, यासाठी सर्व लागणारी साधने देखील उपलब्ध केली जाणार आहेत. काही बालकांना त्रास जाणवू लागला तर पालकांनी शासकीय रुग्णालयात किंवा कोणत्याही आरोग्य रुग्णालयात तात्काळ संपर्क साधून बालकांवर उपचार करून घेणे गरजेचे आहे.

यासंदर्भात कुटुंबाने किंवा पालकांनी भीती न बाळगता आपल्या बालकांना काही आरोग्याच्या अडचणी असतील तर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, यावेळी उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू
इंदापूर तालुक्‍यात (दि.21) शहरी व ग्रामीण भागात 173 बाधित सापडले असून, 148 ठणठणीत बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यात आलेले आहेत. सात रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे अशी माहिती इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.

You May Also Like