महाराष्ट्रात पावसाचे थैमान : रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा तडाखा

मुंबई । गेल्या चोवीस तासांमध्ये  कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.

मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. एनडीआरएफची ९ पथके तैनात  करण्यात आली आहेत.

 

चिपळूण आणि खेडमधील सद्य:स्थिती

  • प्रशासनाकडून ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
  • नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
  • परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
  • खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
  • भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • बचाव कार्यासाठी सध्या खाजगी 6, कस्टम 1, पोलीस 1, नगरपरिषद 2, तहसील कार्यालयाच्या 5 बोटी मदत करत आहेत.
  • हवाई दलाचे दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.
  • नौदलालाही मदतीसाठी विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.
  • एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. ‘राजू काकडे हेल्प फाऊंडेशन’ चे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे. जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. या भागातील परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि इतर विभागांना तातडीने बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच नद्यांच्या पातळीत वाढ होत असल्याने स्थानिकांनी खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोव्हिड रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले. या बैठकीत नद्यांच्या पातळीची परिस्थिती सुद्धा सांगण्यात आली.  रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटरवरुन वाहते आहे. वशिष्ठी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटरवरुन वाहते आहे. रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवल्या आहेत.

 

पुणे चिपळूणसाठी २ टीम तैनात 

पुण्यातून एनडीआरएफच्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भयानक पूर असल्याचं चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “एनडीआरएफ आणि इतर सुरक्षा पथकं पोहचत आहेत. नगरपालिकेच्या बोटी आता पोहचत आहे. वीज नाहीय. अनेर रुग्ण रुग्णालयात अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी कमी होण्याची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला पाऊस आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने एनडीआरएफ पथकांना पोहचण्यास विलंब होत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

You May Also Like