रायपूर 23 मे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

रायपूर 23 मे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी एका तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आदळून फोडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर यानंतर त्यांनी तरुणाला चापटही मारली एवढं करुनही समाधान न झाल्यानं त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही या युवकाला मारण्यास सांगितलं. हा व्हिडिओ छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव रणवीर शर्मा असं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संबंधित कलेक्टरच्या या कृत्याची मोठ्या प्रमाणात निंदा केली जात आहे. यानंतर कलेक्टरनं याप्रकरणावर सफाई देत आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

ही घटना सूरजपूरमधील भैयाथान चौकातील आहे. जिल्ह्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. या लॉकडाऊन पालन होतंय का हे पाहाण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर फिरताना दिसले. मात्र, सामान्य लोकांना लॉकडाऊनचं पालन करण्याचं शिकवत असताना ते स्वतःच माणुसकीचा धडा विसरुन गेले आणि त्यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी महिलांनाही चुकीची वागणूक दिली. तर, काहींना रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितलं. याचवेळी त्यांनी आपल्या वडिलांसाठी औषधं घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला काठीनं मार दिला.

You May Also Like