राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबद्दल राजभवनाकडे यादीच नाही?

मुंबई : राज्यपाल नियुक्त जागांवर महाविकास आघाडीच्या वतीने नावे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून हा मुद्दा राज्यपालांकडे प्रलबित असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण राजभवनाकडे याबाबत माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता राजभवनने याबाबत वेगळेच उत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

त्यामुळे 12 राज्यपाल निवृत्त जागांवर एकनाथ खडसे, आनंद शिंदे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे फक्त नावापुरतीच चर्चेला होती का वास्तविक ही नावं राजभवनाकडे पाठवण्यात आली आहेत की नाही यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस राज्यपाल सचिवालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी माहिती विचारली होती की मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी. तसंच मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री सांगतात की, यादी पाठविली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाने यादी देण्यास यासाठी नकार दिला होता. अजून अंतिम निर्णय झाला नाही आणि आता राज्यपाल सचिवालय वेगळेच उत्तर देत आहे. अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की, खरोखरच यादी पाठविली असेल तर मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल सचिवालय यापैकी एकाने माहिती सार्वजनिक करावी. राज्यपालांने यादी असल्यास त्यावर होय किंवा नाही, असा एकतरी निर्णय घेत कोंडी सोडवावी. असे आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी म्हटले आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने बारा नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सबंधित यादी राजभवनाला स्वतः मी घेऊन गेलो होतो, आता राजभवनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही, अनिल गलगली यांना चुकीची माहिती दिली असेल तर त्यांनी अपिलात जावे असे नवाब मलिक यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!