पंढरपूर-मंगळवेढा : पोटनिवडणुकीनंतर तालुक्यातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

पंढरपूर : सध्या देशावर करोनाचे सावट आहे. रुग्णांची वाढती संख्या आवाक्या बाहेर जात असतानाच दुसरीकडे नुकतीच  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून या दोन्ही तालुक्यात यामुळे करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील जनतेच्या मनात यामुळे भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

परिचारक यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आजपर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोनाची लागण झाली असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.

दरम्यान मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यास मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी परिचारक यांनी केली आहे.

तसेच, लस कमी प्रमाणात या दोन तालुक्यात येत असल्यामुळे नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. पंढरपूर व मंगळवेढा येथे यासाठी दोन लसीकरण केंद्र सुरु करावीत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like