एकनाथ खडसेंना क्लीन चीट देणारा अहवाल गायब?

मुंबई । आपल्या पदाचा गैरवापर करुन पुण्यातील एमआयडीसीची जागा नातेवाईकांना दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर करण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. तत्कालिन फडणवीस सरकारने नेमलेल्या या झोटिंग समितीचा अहवाल हा 2017 मध्येच आला होता. मात्र हा अहवाल कधी समोर आला नव्हता.

या दरम्याण, एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. जेणेकरून त्यांच्यावर असलेले आरोप खरे आहेत की, खोटे हे जनतेला समजेल, असं खडसे यांनी म्हटलं होतं. पण फडणवीसांनी अहवाल सादर करणं निरर्थक असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांनी अहवाल गायब झाल्याचं अजित पवारांना सांगितलं आहे. हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्यानं मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. या झोटिंग समितीवर 45 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता हा अहवाल गायब झाल्यानं एकनाथ खडसे यांच्या समस्या वाढू शकतात. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की, कुणी गायब केला?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

You May Also Like