जिल्हाभरात आजपासुन निर्बंधात शिथिलता

धुळे : पॉझिटिव्हिटी दर आणि रिक्त ऑक्सिजन बेडच्या आधारांवर राज्यातील जिल्ह्यांची वर्गवारी ठरवत त्या त्या जिल्ह्यात कठोर निर्बंधात आणखी शिथिलता देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. याच मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्ह्यातील शिथिलतेत आणखी वाढ केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या नवीन आदेशान्वये आता 100 व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडता येणार आहे. असे असले तरी लग्नसोहळ्यासाठी पोलीस विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये जिल्हाधिकार्‍यांनी लग्न सोहळ्यांसह धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. तर आता यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे.

नवीन आदेशान्वये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सायं.5 वाजेपर्यंत सभागृहाच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्के उपस्थिती क्रमप्राप्त ठेवून परवानगी राहणार आहे. तर 100 वर्‍हाडींच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडता येणार आहे. कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता हॉटेल, खानावळी यांना केवळ पार्सल सेवेचीच यापूर्वी परवानगी होती. तर नव्या आदेशान्वये रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळ आता सकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे.

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5 टक्केहुन कमी, ऑक्सिजन बेडचा वापर 25 टक्केपेक्षा कमी आहे. शासनाने निश्चित केलेल्या पाच स्तरापैकी धुळे जिल्ह्याचा पहिल्या स्तरात समावेश आहे. जिल्हाभरातील 50 टक्के क्षमतेसह मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृहे सुरू राहणार आहेत. सर्व उद्योग, व्यवसाय व खासगी आस्थापना व त्यांच्या कर्मचार्‍यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहणार असून प्रत्येक पंधरा दिवसांनी त्यांना कोविड चाचणी करावी लागणार आहे. बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तर शहरी भागात नगरपालिका तसेच नगरपंचायत प्रशासनाची राहणार आहे.

You May Also Like