’शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या’

मुंबई : पेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकर्‍यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकर्‍यांची व्यथा मांडली आहे. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली आहे.

 

करोना संकटात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. केंद्राचा हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, असेही त्यांनी सूचवले आहे.

वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात
खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ’किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचे सरकारने ठरवले की काय, अशी शंका येते. करोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!

You May Also Like