‘जयभीम’ पाहिला, आवडला, मीसुद्धा नव्या चित्रपटांवर काम करतोय, काय म्हणाले संजय राऊत?

औरंगाबाद । शहरात शिवसेनेचा भव्य मोर्चा काढणाऱ्या संजय राऊत यांनी औरंगाबादच्या एमजीएम विद्यापीठात विद्यार्थी आणि पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारणासह चित्रपट, पत्रकारिता तसेच मराठी भाषेविषयी त्यांचे अनुभव व्यक्त केले. एरवी राजकीय पक्ष आणि नेत्यांवर सडेतोड टीका करणाऱ्या राऊत यांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर दिलखुलासपणे आपली मते मांडली, विविध अनुभव सांगितले.
—–‘जयभीम’ चित्रपट आवडला…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘मी जयभीम चित्रपट पाहिला. चित्रपट मला खूप आवडला.’ जय भीम या शब्दाविषयी बोलताना ते म्हणाले, अनेकांना जयभीम हा जातिवाचक शब्द वाटतो. पण मला मात्र हा शब्द कायद्याचा विजय वाटतो. ही फिल्म सर्वांनी पहायला हवी.
सिनेमा बनवताना स्वातंत्र्य घेतलंय. पण आपल्या देशातील एका मोठ्या वर्गाला अद्याप स्वातंत्र्य माहित नाही, कायद्याची मदत मिळत नाही, त्याला राजकारण, मतदान माहिती नाही. अशा समाजातली एक व्यक्ती लढायला उभी राहते, आपल्यातलाच एक तरुण वकील ते शेवटपर्यंत घेऊन जातो.. असे हे कथानक आहे.
—–कुलाब्यातल्या छाबड हाऊसवर नवा चित्रपट करतोय..
ज्या विषयांवर चित्रपट बनवायला लोक धजावत नाहीत, असे विषय मी हातात घेतो. नवाजुद्दीन सिद्दीकी बनवला.
चित्रपटांविषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मला चित्रपट बघायला आवडतात आणि बनवायलाही आवडतात. मी बाळासाहेबांवर चित्रपट बनवला आहे. त्यांच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हे माझे आदर्श आहेत. त्यांच्यावरही मी फिल्म बनवतोय.
कुलाब्यात छाबड हाऊस नावाची ज्यु लोकांची जागा आहे. तिथे सगळ्यात महत्त्वाची जागा आहे. तिथे मोजे नावाचा इस्रायली मुलगा होता. त्यात त्याची आई-वडील या हल्ल्यात मारले गेले. या मुलाचे रेस्क्यू ऑपरेशन झाले. चार पोलिसांनी तब्बल 72 तासांची झुंज दिली. दिल्लीहून एनएसजी कमांडो आले आणि त्या मुलाची सुटका झाली. आपल्या पोलिसांचे शौर्य अप्रकाशित राहिलेय.. ज्या पोलिसांकडे कोणतीही शस्त्र उरली नव्हती. त्यांनी 72 तास अतिरेक्यांशी लढाई चालू ठेवली. त्या मुलाला नंतर इस्रायलला घेऊन गेले. या कथानकावर मी नवा चित्रपट करतोय, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा खासदार संजय राऊत यांच्याशी मुक्तसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर तसेच एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके उपस्थित होत्या.

You May Also Like