बंडखोरी करणाऱ्यांना शरद पवार यांचा इशारा

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आलं आहे.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर हे सरकार टिकावं यासाठी सगळे प्रयत्न आपण करु असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

याआधीही महाराष्ट्रात अशी सत्तासंघर्ष झालेली आहेत, अशी संकट आलेली आहेत, ते आपण निभावून काढली आहेत, तशीच हिम्मत कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि नेत्यांनी ठेवावी, पुढचा काळ अवघड जरी असला तरी त्यातून बाहेर पडू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. तोपर्यंत राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहिल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आता महाविकास आघाडी वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचे संकेत शरद पवार यांनी बैठकीत दिले आहेत.

You May Also Like