केतकी चितळेंवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई । अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यानंतर राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाच विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगत फार बोलणे टाळले. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
तसेच गेल्या काही दिवसांत माझ्याविरोधात होणाऱ्या तक्रारी वाचनात आल्या. मी एका काव्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतर वेगळं चित्र मांडण्यात आले. ते वास्तव नव्हते, असे शरद पवार यांनी सांगितले. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे निर्माण झालेल्या वादावरही शरद पवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास माहिती आहे. औरंगजेबाने त्याच्या कालखंडात काय केले हे माहिती असतानाही कोणीतरी बाहेरून येऊन महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा निषेधच केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह टीकेप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळे हिला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटवरून माहिती दिली. केतकी चितळेला ताब्यात घेतल्याबद्दल ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन, आभार, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर पोलीस केतकी चितळे हिला ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.
—–केतकी चितळेविरोधात तक्रारींचा सपाटा
शरद पवार यांच्यावरील शेलक्या भाषेतील टीकेनंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते केतकी चितळे हिच्यावर प्रचंड संतापले आहेत. या कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच महिला आयोगाकडूनही केतकी चितळे हिच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

You May Also Like