मुंबई । राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला दावा सांगणारे छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यसभेसाठीच्या सहाव्या जागेचा तिढा निर्माण झाल्यानंतर तसेच शिवसेनेने दुसरा उमेदवार देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर संभाजीराजेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही महत्त्वपूर्ण भेट होत आहे. या भेटीत राज्यसभेसाठी शिवसेनेने सहकार्य करावं, असं आवाहन संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना करतील.
संभाजीराजे छत्रपती वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील चर्चेतून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या ६ जागांपैकी अटीतटीची असलेली सहावी जागा शिवसेनेने लढवण्याची भूमिका घेतली आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकासआघाडी आणि भाजपनं मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व आमदारांना देखील पत्र पाठवलं आहे.
—–संभाजीराजेंना शिवसेनेची ऑफर
शिवसेनेनं सहाव्या जागेवर दावेदारी सांगितल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी पक्षात प्रवेश करावा, असं म्हटलं होतं. त्यांनी जर सेनेत प्रवेश केला तर त्यांचा विजय पक्का होईल, त्यांच्या पाठीमागे शिवसेना खंबीर उभा राहिल, असं सेना खासदार विनायक राऊत म्हणाले होते.
—–संभाजीराजे छत्रपती अपक्ष उमेदवारीवर ठाम
शिवसेनेच्या नेत्यांनी पक्ष प्रवेशाची ऑफर दिली असली तरी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांवर निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बदललेल्या संख्याबळानुसार भाजपच्या २ जागा निवडून येतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होईल. सहाव्या जागेवर मला भाजप आणि मविआनं पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.