धक्कादायक! सात किमी पायी प्रवास पाण्याविनाच; मुलीचा तहानेने मृत्यू

जालोर : राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्यातल्या रानीवाडा भागातली ही घटना आहे. एक वृद्ध महिला आपल्या पाच वर्षांच्या नातीसोबत आपल्या नातेवाईकांकडे जायचं म्हणून पायी निघाली होती. जवळपास 12 किलोमीटरचा रस्ता होता. मात्र, टळटळीत दुपार, प्रखर ऊन आणि कच्च्या रस्त्यावर पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने या पाच वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वयस्क महिलेलाही उन्हाचा त्रास झाल्याने तीही बेशुद्ध अवस्थेत आहे.

ह्या दोघींना असं तापलेल्या जमिनीवर पडलेलं पाहून शेजारुन जाणार्‍या एका युवकाने गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि या वृद्धेला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. चौकशीत हे समोर आलं की सिरोहीमधल्या रायपूर गावातून ह्या दोघी निघाल्या होत्या. त्या सलग नऊ तास चालत होत्या, त्यांनी सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. मात्र उन्हाचा तडाखा या दोघींनाही सहन झाला नाही आणि त्या चिमुरडीने प्राण सोडले.

You May Also Like