धक्कादायक! नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोर्‍हे यांचे निधन

नाशिक : आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोर्‍हे (44) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रशिक्षक मोनाली गोर्‍हे यांच्या मृत्यूपूर्वी काही तास आधीच त्यांच्या वडीलांचे मनोहर गोर्‍हे (73) यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोनाली यांनी माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवल्यानंतर एक्सेल शुटींग नावाने नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. गत दशकभराहून अधिक काळापासून मोनाली या त्यांच्या सहकार्‍यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.
मोनाली गोर्‍हे यांचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी मनोहर गोर्‍हे यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदिरानगरच्या जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी मनोहर गोर्‍हे यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार होता. मात्र, त्यांच्या पाठोपाठ मोनाली यांचेही निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

You May Also Like