धक्कादायक: मुलाच्या मृत्यूनंतर 10 लाख घेऊन सून फरार

नाशिक : येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली होती. या दुर्घटनेत 21 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिकेनं आणि राज्यसरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला होता. अशी ही दहा लाख रुपयांची सरकारनं केलेली मदत सुनेनं पळवुन सासू सासर्‍यांना वार्‍यावर सोडल्याची घटना समोर आली आहे.

ऑक्सिजन गळती दुर्घटनेत एकुलता एक असलेला मुलगा गमावल्यानंतर सरकारनं दिलेली मदत आधार ठरेल असं वाटलं होतं. मात्र, सुनेनं सासु सासर्‍यांना धक्का देत सर्व रक्कम गायब केल्याने वृद्ध आई वडील हतबल झाले आहेत. सून पैसे घेऊन फरार झाल्याचं कळताच हतबल झालेल्या वयोवृद्ध दाम्पत्यानं जिल्हाधिकार्‍यांकडे मदतीसाठी विनंती केलीयं.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली होती. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर, दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात यश आलं. पिरसिग महाले आणि लता महाले असं या निराधार दाम्पत्याचं नाव आहे. संबंधित दाम्पत्याच्या सुनेनं मदत निधीच्या कागदपत्रांवर बळजबरीनं दोघांची सही आणि अंगठ्याचा ठसे घेतले आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारावर तिनं शासनाकडून मिळालेली सर्व आर्थिक मदत लांबवली आहे. पैसे हातात पडताच तिनं सासू सासर्यांना वार्‍यावर सोडून पोबारा केला आहे. यामुळे संबंधित दाम्पत्य निराधार झालं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!