धक्कादायक! समुद्रात दोन जहाजं भरकटली; ४१० जणांचे प्राण संकटात

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ संथपणे गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला. एनडीआरएफसह प्रशासन चक्रीवादळाच्या आपत्तीला तोंड देत असतानाच मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. एका जहाजावर २७३, तर दुसर्‍यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं आहे.

मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर २७३  जण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याचे समजते. वादळामुळे ही बोट भरकटलीय. बोटीने नांगर टाकलेल्या नसल्याने ती वादळामुळे आलेल्या वार्‍यासोबत वाहत गेली. ही बोट बंदरामधील तसेच समुद्रकिनार्‍याच्या जवळ असणार्‍या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने या बोटीवरील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. त्याचप्रमाणे मुंबईच्या किनारपट्टीपासून  ७० किमीवर असणार्‍या बॉम्बे हाय या तेल उत्पादन घेणार्‍या प्रकल्पालाही ही बोट धडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने या बोटीला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

You May Also Like