धक्कादायक..पत्नीने घेतला जगातून निरोप, पतीने रुग्णालयातून पळवला मृतदेह!

बीड : करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर कोविड नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातात. संसर्ग टाळण्यासाटी रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. रुग्णालय आणि स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यविधी करतात. मात्र बीडमध्ये चक्क पतीनं करोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेहच पळवून नेल्याची घटना घडली.

बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टर आणि नर्सच्या तक्रारी वरून या प्रकरणी पती आणि नातेवाईकांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीनं मृतदेह पळवून नेल्याची बीड जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे. गेवराई तालुक्यातील कुंभारवाडीमधील सुरवसे कुटुंबातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर बीडमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अंत्यविधीसाठी मृतदेह देण्याची मागणी केली. मात्र डॉक्टरांनी आणि नर्सने कोरोनाचा रुग्ण असल्यामुळं मृतदेह अंत्यविधीसाठी देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलं. मात्र कुटुंबीय मृतदेह मिळण्यासाठी वाद घालत होते. काही वेळानं डॉक्टर व नर्सेसची नजर चुकवून महिलेचा पती रुस्तुम सुरवसे यांनी नातेवाईकांच्या मदतीनं मयत पत्नीचा मृतदेह गाडीत टाकून पळवून नेला. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

You May Also Like