आंतराष्ट्रीय योग दिनापासून (२१ जून) केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील लस मोफत

नवी दिल्ली : येत्या आंतराष्ट्रीय योग दिनापासून (२१ जून) केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील लस मोफत देणार आहे. यापुढे ७५ टक्के लसखरेदी केंद्र सरकारच करेल. त्यामुळे राज्यांना लस खरेदीसाठी खर्च करावा लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संवादात केली. लसीकरणात सध्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुरुवातीच्या धोरणाप्रमाणेच यापुढे केंद्र सरकारकडूनच मोफत लस दिली जाईल. दोन आठवड्यात याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“दुर्दैवाने पंतप्रधानांनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे” असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. तसेच मोदींना पत्र लिहून सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी मांडली होती. यासाठी त्यांना चार महिने लागले असं देखील म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “फेब्रुवारी २०२१ मध्ये आणि त्यानंतरही अनेकदा मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी मांडली होती. यासाठी त्यांना चार महिने लागले आणि तेदेखील दबाव आल्यानंतर.अखेर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असून आम्ही कित्येक दिवसांपासून करत असलेल्या मागणीची अमलबजावणी होत आहे” असं ममता यांनी म्हटलं आहे.

You May Also Like