सोनगीर येथील जवानाला आसाममध्ये वीरमरण

सोनगीर । येथील जवान निलेश माळी हे आसाममधील गुवाहाटी येथील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान,  सहा महिन्यांपूर्वी मणिपूर येथे देशसेवेत कार्यरत असतांना गोळी लागून ते जबर जखमी झाले. त्यांच्यावर इंफाळ, दिमापूर, दिल्ली असे विविध ठिकाणी उपचार करण्यात आले.  मात्र शेवटी काळाने होत्याचे नव्हते केले. आणि शनिवार दि.  24 रोजी रात्री ८.३० च्या सुमारास त्यांना वीरगती प्राप्त झाली. 

 

मामा, मावसा यांनी केला सांभाळ 
 निलेश यांचे वडील अशोक माळी व आई अरूणा यांचे ते लहान असतानाच निधन झाल्याने मामा व मावसा झिंगा जाधव  यांनी त्यांचे व त्यांचे मोठे बंधू दीपक यांचा सांभाळ केला. दीपक बाभळे येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीत काम करतात.  निलेश व त्यांचे भाऊ दीपक अद्याप अविवाहित आहेत.
दरम्यान शहीद निलेशचे पार्थिव मंगळवारी (ता. 27) येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचदिवशी येथील स्वामी नारायण मंदिराजवळील मोकळ्या पटांगणात त्यांचेवर अंत्यसंस्कार होतील. रविवारी (ता. 25) अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले. त्यावेळी सरपंच रुखमाबाई ठाकरे, तलाठी जितेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य शामलाल मोरे, गटनेते आर. के माळी, उपसरपंच धाकू बडगुजर, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, शाम माळी, साहेबराव बिरारी, निखिल परदेशी, हाजी अल्ताफ कुरेशी, रवींद्र बडगुजर, सुनील भदाणे, पराग अहिरराव, भुषण मोरे आदी उपस्थित होते.

You May Also Like