सोनिया गांधींचे धक्कातंत्र?; पक्षाच्या शिबिरात कठोर निर्णय घेण्याचे संकेत

उदयपूर (राजस्थान): काँग्रेस पक्षात नेतृत्वबदलापासून घराणेशाही संपवण्यापर्यंत अनेक कठोर, अनपेक्षित आणि धक्का देणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राजस्थानातील नवसंकल्प शिबिराचे उद्घाटन करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी याचे संकेत दिले. काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबातील सदस्याने करावे, की गांधी कुटुंबाबाहेरच्या या मतभेदाच्या मुद्द्यावर सहमती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या शिबिरात होण्याची शक्यता आहे.
राजस्थानातील उदयपूरच्या ताज अरावली येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या नवसंकल्प शिबिराचे उद्घाटन करताना सोनिया यांनी सुरुवातीला इंग्रजी आणि नंतर हिंदीमध्ये संबोधित केले. या शिबिराला नवसंकल्प शिबीर नाव देण्यात आले आहे. देशभरातील ४३० अव्वल काँग्रेसजन या शिबिरात भाग घेत आहेत. काँग्रेस पक्षात एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या फॉर्म्युल्यातून गांधी कुटुंबाला वगळण्यात येणार आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या मुलांसाठीही ‘एक कुटुंब-एक तिकीट’ नियम शिथिल केला जाण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी काँग्रेस पक्षात कमीतकमी पाच वर्षे काम केलेल्या नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी अट घातली जाणार आहे. पक्षात आलेल्या नव्या व्यक्तीला उमेदवारी मिळणार नाही. सलग पाच वर्षे पदाधिकारी असलेल्या नेत्याला पुढची तीन वर्षे कोणतेही पद दिले जाणार नाही.
‘काँग्रेस पक्षापुढे निर्माण झालेली आव्हाने अभूतपूर्व आहेत. अशा असामान्य परिस्थितीचा मुकाबला असामान्य पद्धतीनेच केला जाऊ शकतो. काँग्रेसचे पुनरुत्थान केवळ अटळ अशा विशाल सामूहिक प्रयत्नांनीच होऊ शकते. हे प्रयत्न टाळले जाणार नाहीत,’ असे सोनिया गांधी यांनी ‘नवसंकल्प’ शिबिराचे उद्घाटन करताना सांगितले. शक्तिहीन झालेल्या काँग्रेसच्या कायापालटासाठी कठोर आणि ठोस पावले उचलण्याचे संकेतही त्यांनी दिले. ‘आम्हाला सुधारणांची नितांत आवश्यकता आहे. पक्ष आणि व्यक्तिगत पातळीवर आम्हा सर्वांसाठी ही चिंतन आणि आत्मचिंतनाची वेळ आहे. आम्ही सामूहिक प्रयत्नांनीच बदल घडवू शकतो. आम्हाला वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्ष संघटनेच्या हितासाठी काम करावे लागेल,’ असे सोनिया म्हणाल्या. ‘नवसंकल्प शिबिरात काँग्रेसजनांनी खुलेपणाने विचार व्यक्त करावे. पण बाहेर मजबूत पक्ष संघटना, ठाम निर्धार आणि ऐक्याचाच संदेश जायला हवा,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘आम्हाला आलेले अपयश, भविष्यातील संघर्ष आणि अडथळे तसेच जनतेच्या अपेक्षांविषयी आम्ही अनभिज्ञ नाही. या बिघडत्या काळात जनतेला अपेक्षित असलेली भूमिका काँग्रेस पक्ष बजावेल, असा निर्धार करून एक नवा आत्मविश्वास आणि प्रतिबद्धतेने प्रेरित होऊन आम्ही येथे एकत्र आलो आहोत,’ असे सोनिया गांधी म्हणाल्या.
—–प्रचाराचा अभाव कमजोरी : अशोक गहलोत
‘भाजप देशात धर्माच्या नावावर सत्तेत प्रस्थापित झाले आहेत. धर्म आणि जातीच्या नावावर दंगली भडकविण्याच्या बाबतीत राजस्थानला सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असा प्रश्न बेशरमपणे विचारला जातो. आम्ही काम करतो पण त्याचा प्रचार करीत नाही, ही आमची कमजोरी आहे. भाजपचे खोटारडे लोक काम कमी आणि प्रचार जास्त करतात,’ अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
—–‘आघाडीपूर्वी घर सावरणार’
‘काँग्रेस पक्ष आधी आपले घर नीट करील. त्यानंतर मित्रपक्षांसोबत आघाडीसाठी चर्चा होईल,’ असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिबिराचे उद्घाटन होण्यापूर्वी स्पष्ट केले. ‘या शिबिरात काँग्रेस पक्ष आपल्या त्रुटींवर मंथन करेल आणि पक्ष मजबूत करण्यावर भर देईल. आम्ही काँग्रेसला अतिशय सक्रिय आणि शक्तिशाली करू इच्छितो. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीविषयी चर्चा करू,’ असे खरगे म्हणाले.
—–‘अल्पसंख्याकांवर क्रूर अत्याचार’
‘भाजपने देशवासीयांना भयाच्या सावटाखाली जगण्यास बाध्य केले आहे. धर्माच्या नावावर ध्रुवीकरण केले जात आहे. दलित, आदिवासी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अभिप्रेत असलेला ‘किमान शासन, कमाल प्रशासना’चा अर्थ समान अधिकार असलेल्या अल्पसंख्याकांवर क्रूर अत्याचार करणे हाच असल्याचे अतिशय वेदनादायी पद्धतीने स्पष्ट झाले आहे. राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करून पंडित नेहरूंचे योगदान आणि त्यांच्या त्यागाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वांना हरताळ पुसून त्यांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण केले जात आहे,’ अशी टीका सोनिया यांनी केली.

You May Also Like