बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये; केंद्राची महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट मदत

मुंबई: सध्या देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान अनेक राज्यं केंद्राकडे मदत मागत असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत. करोना रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रातही मोठी समस्या असून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मदतीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

तसेच, त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख 35 हजार रेमडेसीविर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच 1100 व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

सर्व नागरिकांना लस मोफत देणार, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. मात्र, एखाद्या राज्याला वाटले की त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खासगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात.

मात्र, आता महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत? आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. 1 तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like