राज्यात फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग; भाजप नेत्यांची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत. पंतप्रधानांसोबत बैठक सुरू असताना राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू असतानाच राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ’सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

दरम्याण, फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, फडणवीसांनी बोलावली बैठक ही पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी काहीही संबंध नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, जीएसटी थकबाकी आणि तौत्के वादळाच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चांगलच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही दरेकर म्हणाले.

You May Also Like