जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली. जणू काही निसर्ग मुंबईवर चाल करून आला आहे

मुंबई : मुंबईकर शनिवारी साखरझोपेत असतानाच पुन्हा एकदा आकाशात अतिवृष्टीचे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबत जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली. जणू काही निसर्ग मुंबईवर चाल करून आला आहे, असे वातावरण निर्माण झाले आणि काही क्षणातच पावसाने मुंबईला झाेडपून काढले.
मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ ते १०च्या दरम्यान दादरपासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर याठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या काळात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरुच होता. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला कवेत घेतले होते. विशेषतः मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची भल्या पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू होती.

पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसाने शनिवारी पहाटे शंभरी ओलांडली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पश्चिम उपनगरातल्या गोरेगाव आणि बोरिवली या ठिकाणांसोबत कुर्ला येथेही पावसाने जवळजवळ शंभरी ओलांडली. शतक पूर्ण करतानाच पावसाने टपोऱ्या थेंबांच्या माध्यमातून चौकार आणि षटकार लगावले.

सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर जणूकाही ओढे वाहू लागले. पावसाचा तुफानी मारा सुरू असतानाच सकाळी पावणे अकराच्या सुमारास हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. पावसाने ताे खरा ठरवला. सकाळी पावणे अकरा वाजता पुन्हा एकदा तुफान मारा सुरू केला.

पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा महापूर मात्र कायम होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला अंधेरी रोड, चेंबूर लिंक रोड, दोन्ही एक्स्प्रेस या प्रमुख मार्गांवर पावसाने दाणादाण उडवून दिली. काही सखोल भागात पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
सकाळी ११ वाजता यात आणखी भर पडली. मुंबईच्या रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ लागली. याच काळात मुंबईचे नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले. पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट सुरू झाला. अशा काहीशा वातावरणाने मुंबईकरांना धडकी भरली. त्यानंतर दुपारी तसेच संध्याकाळी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली.

You May Also Like