सुनील छेत्रीने मोडला लियोनेल मेसीचा विक्रम

दोहा : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने 2022 फुटबॉल विश्वचषक आणि 2023 एशियन कप क्वालिफायरच्या ग्रुप ई मध्ये दुसर्‍या फेरीत बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत बांगलादेशवर 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासोबतच छेत्रीने अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.

यादरम्यान सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील आपल्या गोलची संख्या 74वर पोहोचवली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डो 103 गोलसह अव्वल स्थानावर आहे.

या लढतीतील दोन गोलसोबतच सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणार्‍या फुटबॉलपटूंच्या यादीत सुनील छेत्री 11व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या पुढे दहाव्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटे आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह प्रत्येकी 75 गोलसह संयुक्तरीत्या दहाव्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीच्या मागे असलेल्या युएईच्या अलीने गेलया आठवड्यात मलेशियाविरुद्धच्या लढतीत आपला 73 वा गोल केला होता. तर मेसीचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 72 गोल आहेत.

You May Also Like