सुनील पाटीलचे अमित शहांबरोबर व्हिडीओ- नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

मुंबई । सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधीच भेटलो नाही. त्यांचे आणि माझे काहीच संबंध नाही, असं सांगतानाच सुनील पाटील यांचे भाजप नेते अमित शहांबरोबरचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते मोहित कंबोज यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सुनील पाटील प्रकरणावरही भाष्य केलं. सुनील पाटीलला मी आयुष्यात भेटलो नाही. सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काहीच संबंध नाही. उलट पाटीलचे अमित शहासोबतचे व्हिडीओ आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. सुनील पाटीलचे मंत्री राणांसोबतचे कंबोज फोटो दाखवत होते, असा दावा मलिक यांनी केला आहे.
आम्ही फोटोंवरून आरोप करत नाही. कोणत्या पक्षाचा व्यक्ती आहे हे आम्ही सांगत नाही. पण सुनील पाटीलही फ्रॉड आहेत. तेही वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा प्लेअर आहे, असा दावा त्यांनी केला.
6 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा मला पत्रकार परिषदेच्या दोन तासानंतर सुनील पाटीलचा फोन आला होता. साहेब मी धुळ्याहून बोलतोय. मी तुम्हाला या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती देऊ शकतो, असे सुनील पाटील म्हणाले होते. त्यावर मी त्यांना मुंबईत यायला सांगितलं. दुसऱ्या पत्रकार परिषदेवेळीही त्यांचा फोन आला. विजय पगारे जेव्हा माझ्याकडे आले. तेव्हाही पाटील आले नाही. पगारेंसोबत भंगाळे नावाचा व्यक्ती होता. त्याच्या फोनवरून त्यांनी सुनील पाटीलशी चर्चा केली. तुम्ही घाबरू नका. मलिक साहेब तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतील असे भंगाळेंनी पाटील यांना सांगितले. मला नंबर दिला. तेव्हा मी डायल केला असता पाटीलचाच नंबर होता. मी सांगितलं तुम्ही या. पोलिसांना शरण या. सत्य सांगा. त्यावर ते म्हणाले की, मी गुजरातला आहे. मला थांबवले आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येईल. पण अजून ते आले नाहीत, असे मलिक यांनी सांगितले.
यावेळी मलिक यांनी आपली लढाई कोणत्याही पक्षाविरोधात किंवा राजकारण्याविरोधात नसल्याचे स्पष्ट केले. वानखेडेची आर्मी ड्रग्ज वसुली करणाऱ्यांकडूनही पैसे उकळत आहे. वानखेडेंनी या शहराला पाताल लोक केले आहे. मी एनसीबीविरोधात लढत नाही. मी भाजपविरोधात लढत नाही. मी चुकीच्या लोकांविरोधात लढत आहे. या शहरात ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली होत आहे. निरपराध मुलांना फसवले जात आहे. नशेचा कारोबार चालत आहे. लोकांना टार्गेट करून वसुली सुरू आहे. त्याविरोधात माझा लढा आहे, असेही ते म्हणाले.

You May Also Like