भारताच्या नकाशासोबत ट्विटरकडून पुन्हा छेडछाड?

कठोर कारवाईचे संकेत
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे. एका ट्विटर युझरने ही बाब समोर आणली आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर गेल्यावर त्यावर दिसणार्‍या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारतापासून विभक्त दाखवण्यात आले आहेत. यानंतर अनेक नेटिझन्सनी विविध सरकारी हॅण्डलला मेंशन करुन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचं दाखवलं आहे. म्हणजेच ट्विटरच्या मते जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे भाग नाहीत.

मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. ट्विटरविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. याआधी 12 नोव्हेंबर रोजी सरकारने लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखच्या ऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटीस जारी केली होती.

You May Also Like

error: Content is protected !!