धुळ्यात भाडेकरुने केला घरमालकाचा खून

आरडाओरड झाल्याने संशयिताला पकडले
धुळे : स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश श्रीराव यांच्या डोक्यात भाडेकरु मेमाने नामक तरुणाने लोखंडी पावडी टाकून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ यावेळी मारेकरी तरुणाने महिलेशी झटापट केली़ पण प्रसंगावधान राखून तिने स्वत: सुटका करीत आरडा ओरड केल्यामुळे नागरीकांच्या कचाट्यात मारेकरी सापडला़ त्यास तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़

शहरातील चितोड रोडवरील संभाप्पा कॉलनीच्या पाठीमागे राजहंस कॉलनी आहे़ या कॉलनीत रमेश हिलाल श्रीराव (60) यांचे निवासस्थान आहे़ ते स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी धुळे शहरासह कुसुंबा, एमआयडीसी, पुष्पांजली मार्केट अशा विविध शाखेमध्ये काम केले आहे़ एप्रिलमध्ये ते निवृत्त झाले़ ते सध्या राजहंस कॉलनीत स्थायिक झाले असून त्यांनी आपले घर मेमाने नामक व्यक्तीला भाडेतत्वावर दिले आहे़ ते देखील निवृत्त शिक्षक आहे़ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते भाड्याने राहत आहेत़ त्यांचे भाडे थकले असल्यामुळे श्रीराव यांनी तगादा लावल्याची चर्चा आहे़ मेमाने यांच्या मुलाने त्याचा राग मनात धरुन सकाळी श्रीराव यांचे घर गाठले़ त्यावेळेस श्रीराव हे आपल्या वरच्या खोलीत ध्यानधारणा करत बसले होते़.

त्याचवेळेस त्यांच्या डोक्यात लोखंडी पावडी टाकून त्यांचा खून करण्यात आला़ यानंतर वरच्या खोलीतून खाली आल्यानंतर मारेकरी तरुणाने त्यांच्या पत्नीला देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यात झटापट झाल्याने त्या त्याच्या तावडीतून सुटल्या आणि घराच्या गॅलरीत जावून त्यांनी आरडा ओरड केली़ महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरीकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि मारेकरी तरुणाला पकडले़ शहर पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले़ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला असून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also Like