The Center and all the states will work together to tackle this crisis – Prime Minister Modi

कोरोनाविरूद्धच्या लढाईत ऑक्सिजन पुरवठा गतीमान करण्यासाठी पुरवठय़ाचा वेळ वाचविला पाहिजे. त्याकरिता रेल्वेच्या ऑक्सिजन एक्सप्रेसबरोबरच हवाईदलाचीही मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्याबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीत दिली. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करूया असेही पंतप्रधान म्हणाले.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या रोज तीन लाखांवर जात असून, सर्वच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. देशाच्या अनेक भागात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचे प्राण जात आहेत. हे भयंकर चित्र असतानाच विरोधी पक्षशासीत राज्यांना मदत करण्याबाबत केंद्र सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अकरा प्रमुख राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गुजरात, केरळ, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

इंजेक्शन, औषधांचा काळाबाजार कठोरपणे रोखा

देशाच्या काही भागात रेमडेसिवर इंजेक्शन आणि अत्यावश्यक औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. कठोरपणे हा काळाबाजार रोखावा असे पंतप्रधान म्हणाले.

‘मिशन मोड’वर लसीकरण

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे. ‘मिशन मोड’वर हे लसीकरण राबविले जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान काय म्हणाले?

कोरोनाविरूद्ध लढाईत सर्वांमध्ये समन्वय आवश्यक आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी कोणत्याही राज्यांनी टँकर्स अडवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

देशातील अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा पुरवठय़ाचा वेळ वाचविणे आणि गतीमान करण्यासाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केल्या आहेत. आता हवाई दलाच्या विमानांचीही मदत घेतली जात आहे. ‘एअर्सलिफ्ट’ करून ऑक्सिजन वेळेत पुरवण्यात येईल.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. लोकांनी घाबरून खरेदीसाठी घराबाहेर पडू नये यासाठी जागृती करावी.

बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण; पंतप्रधानांची नाराजी आणि केजरीवालांची माफी

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू असताना तांत्रिक गडबड झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाले. ही बाब लक्षात येताच पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यानंतर केजरीवाल यांनी माफी मागितली.

या बैठकीत प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यातील परिस्थितीची माहिती देत होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करावा, लसची किंमत एकच ठेवावी. केंद्र आणि राज्यांसाठी वेगवेगळ्या किंमती कशासाठी? आदी मुद्दे मांडले. यावेळी लाईव्ह प्रक्षेपण होत होते. हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली.

‘अशा अंतर्गत बैठकांचे मुख्यमंत्र्यांनी प्रक्षेपण करणे हे परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही असे पंतप्रधान म्हणाले. त्यावर केजरीवाल यांनी खेद व्यकत केला. चुकीचे केले असेल तर माफी मागतो असे ते म्हणाले.

You May Also Like