केंद्र-बंगाल सरकार आमने-सामने; सीआरपीएफ जवानांसह सीबीआय ऑफिसवर दगडफेक

कोलकाता : बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषणने तपास सुरू केलाय. सीबीआयने अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आलं. आता या सर्वांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.

या कारवाईदरम्यान पुन्हा एकदा केंद्र आणि बंगाल सरकार आमने-सामने आलेले दिसत आहेत. आपल्या मंत्र्यांच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी त्या सीबीआयला म्हणाल्या- मलाही अटक करा. सरकारच्या वकीलाने म्हटले की, नोटिस दिल्याशिवाय मंत्री आणि आमदारांना अटक करता येत नाही. ममता सीबीआयच्या कार्यालयात गेल्यानंतर तृणमूल कार्यकर्तेही तेथे जमले आणि दगडफेक केली. यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

डमी कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप
२०१६ मध्ये बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा न्यूज पोर्टलने टेप जारी केले होते. या स्टिंग ऑपरेशननंतर दावा करण्यात आला की, टेप २०१४ मध्ये रेकॉर्ड केले आहेत. टेपच्या हवाल्याने तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदारांना डमी कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप लावला होता. हायकोर्टाने २०१७ मध्ये याचा तपास सीबीआयकडे सोपवला.

You May Also Like