मुख्यमंत्र्यांनी महापूराच्या नुकसानीचा घेतला आढावा

चिपळूण ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तं चिपळूण मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून महापूराच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं.

 

तातडीने मदत देणार

पूरग्रस्तांपैकी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, संपूर्ण आढावा घेऊन योग्य ती मदत करण्यात येईल. आर्थिक मदतीसह इतरही सर्व मदत करणार आहोत. आता पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

प्रत्येक जिल्हयात एक टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान बदलाचा फटका बसला आहे. आपण वस्तूस्थिती स्वीकारली पाहिजे. संकटांचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार केली जाणार आहे. कोकणात पूर व्यवस्थापन उभारणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.

 पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात सुद्धा अतिवृष्टीने पूरस्थितीत निर्माण झाली आहे. या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री पाहणी दौरा करणार आहेत. उद्या म्हणजेच 26 जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

 

You May Also Like