कोविड-19 विषाणूने जगभरातील अनेकांचे प्राण घेतले आहेत. पण त्याचा प्रकोप अजूनही कमी झालेला नाही

मुंबई : कोविड-19 विषाणूने जगभरातील अनेकांचे प्राण घेतले आहेत. पण त्याचा प्रकोप अजूनही कमी झालेला नाही. या विषाणूचे नवे व्हेरियंट तयार होत आहेतच, त्याबरोबर कोविडची बाधा होऊन बरे झालेल्या रुग्णांमध्येही वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस किंवा डेथ ऑफ बोन टिश्युज दिसून आल्याने मुंबईतील डॉक्टर चिंतेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस या आजारांची लक्षणं दिसून आली होती. तशीच आता मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसून आली आहेत आणि येत्या काही महिन्यांत अशी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते अशी चिंता मुंबईतील डॉक्टरांना वाटत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोविड-19 बाधितांवर परिणामकारक ठरणारी स्टिरॉइड्स म्युकरमायकॉसिस झालेल्या आणि आता अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस झालेल्या रुग्णांना दिली होती. हा दोन्ही प्रकरणांमधील सामायिक घटक आहे. कोविडवरील उपचार घेतल्यानंतर 2 महिन्यांनी अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसलेल्या 40 वर्षांखालील 3 रुग्णांवर माहिममधील हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार केले आहेत. माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल म्हणाले, ‘ त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरच्या भागात दुखणं जणवलं, ते सगळे डॉक्टर होते म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आलं आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी हॉस्पिटल गाठलं.’

You May Also Like