क्रूरतेचा कळस! विकृताने मुक्या जीवाचे फोडले डोळे

पुणे : अलीकडेच एका युट्युबरने कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवलं होतं. ही घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये एका विकृताने धारदार शस्त्राने भोसकून एका भटक्या कुत्र्याचे डोळे फोडल्याची क्रूर घटना समोर आली. डोळे फोडल्यामुळे संबंधित श्वान रात्रभर विव्हळत पडलं होतं. या घटनेची माहिती मिळताचं श्वानप्रेमी अक्षय म्हसे याने कुत्र्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी डॉक्टरांनी जखमी कुत्र्यावर उपचार केले असून दोन्ही डोळे निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी माहिती दिली आहे. उंडे यांनी सांगितलं की, जुन्या सांगवी परिसरात राहणारा अक्षय म्हसे नावाचा श्वानप्रेमी तरुण दररोज रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला घालतो. काल त्याला एक कुत्रा जखमी अवस्थेत असल्याच समजलं. यानंतर अक्षयने संबंधित कुत्र्याला शोधलं, यावेळी कुत्र्याचे डोळे फोडल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. तसेच कुत्र्याच्या अंगावर अन्य ठिकाणीही जखमा आढळल्या. त्यानंतर अक्षयने तात्काळ या कुत्र्याला पशुवैद्यकिय रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारही केले.

मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे, कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी झाले असून रात्रभर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांच्या पुष्टीनंतर श्वानप्रेमी अक्षय म्हसे याने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्राण्याला क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक कायद्यासह कलम 429 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कुत्र्याचे डोळे कुणी फोडले याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांकडे नाही.

You May Also Like