चालकाला मारहाण करुन लुटले

दोघांना अटक, धुळे एलसीबीची कारवाई
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी (ता.शिरपूर) शिवारात प्रवासी म्हणून बसलेल्या चौघांनी चालकास मारहाण करीत त्याच्याकडील कारसह मोबाईल नेणार्‍या दोघा लुटारुंना एलसीबी पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केले. अन्य दोन लुटारु पसार असून त्यांचाही शोध सुरू आहे.

इंदुर (मध्यप्रदेश) येथील आयुष ओमप्रकाश बलदवा 22 जूनला अर्टींगाने (एमपी41/सीए7705) इंदुरहून नाशिकला जात होते. चार जण प्रवासी म्हणून त्यांच्या कारमध्ये बसले. सांगवी जवळील व्होरापाणी शिवारात चौघांनी लघुशंकेच्या बहाण्याने चालक आयुषला कार थांबविण्यास सांगितले. कार थांबताच चौघांनी चालकाला मारहाण करीत कारखाली फेकले, त्यांच्या जवळील आठ हजारांचा मोबाईल, चार लाखांच्या कारसह चारही लुटारू पसार झाले होते. याप्रकरणी आयुष बलदवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलिसांनी तपास सुरू केला. महामार्गावरील हॉटेल बाबुजी जवळ चोरीची गाडी विकण्यासाठी दोन जण येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयित अजय कोळी, त्याचा साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची अर्टीगाही होती. पोलिसांना पाहून चारही जणांनी पळ काढळला. पोलिसांनी दोन जणांना पकडले अजय दिलीप कोळी (22), सुभाष रघुनाथ कोळी (36, दोघे रा.थाळनेर, ता.शिरपूर) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी कार चोरीची कबूली दिली. पसार झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. निरिक्षक बुधवंत, उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्यासह पोलिसांनी कारवाई केली.

You May Also Like