पदार्पणातच सात विकेट घेणारा इंग्लंडचा गोलंदाज निलंबित

नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात इंग्लंडने वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला पदार्पणाची संधी दिली आणि त्याने अप्रतिम कामगिरी करत दोन डावांमध्ये सात विकेट घेतल्या. परंतु, आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे.

इंग्लंड आणि ससेक्सचा गोलंदाज ऑली रॉबिन्सनने 2012 आणि 2013 मध्ये केलेल्या ट्विट्सची चौकशी सुरु आहे. ती पूर्ण होऊन निकाल येईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे रॉबिन्सनला 10 जूनपासून एजबॅस्टन येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.

रॉबिन्सनने कसोटी पदार्पणात अप्रतिम कामगिरी केली. त्याने लॉर्ड्स येथे झालेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात 75 डावांत 4 विकेट आणि दुसर्‍या डावात 26 धावांत 3 विकेट घेतल्या. तसेच त्याने पहिल्या डावात 42 धावांची उपयुक्त खेळी केली. परंतु, त्याच्या या कामगिरीपेक्षाही त्याने 2012-13 मध्ये केलेल्या वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विटची अधिक चर्चा झाली. त्यामुळे या कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याने केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली. वर्णभेद आणि लिंगभेद याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी केलेल्या चुकीची मला कल्पना असून मला या गोष्टीची लाज वाटत आहे, असे रॉबिन्सन म्हणाला होता.

रॉबिन्सनने 2012-13 मध्ये काही वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट केले होते. त्याने कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्याची जुनी ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणाची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड चौकशी करत असून ती पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नसल्याचे ईसीबीने सांगितले.

You May Also Like