मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान देण्यात आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे, असं राऊत म्हणाले.

एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

You May Also Like